यशस्वी होण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
विनम्रता, धाडसीपणा, मोठी स्वप्ने पाहावीत आणि ज्ञानाला पर्याय नाही हे सर्व माझ्या शिक्षकांनी मला शिकवले.एक योग्य शिक्षक हजारो गुणवंत विद्यार्थी घडवतो. कुंभार हा ज्याप्रमाणे ओल्या मातीला आकार देऊन कलाकृती घडवतो अगदी त्याचप्रमाणे एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतो.प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात शिक्षकाचे खूप मोठे योगदान असते.आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षकाची भूमिका खूप मोठी असते.औरंगाबाद महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी ’ सांजवार्ता ’ ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांच्या यशाचे श्रेय आपल्या आयुष्यातील शिक्षकांना दिले.
इयत्ता 6 वी ते 8 वी पर्यंत उदयराज मिश्रा, 12 व्या इयत्तेपर्यंत बालकृष्ण तिवारी, त्यानंतर अलाहाबाद विश्वविद्यालयात पदवी, पीएचडी पर्यंत प्रा.एन.आर.फारुखी यांनी आस्तिक कुमार यांना शिकवले. जिद्द आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर 2010 मध्ये युपीएससी परिक्षेत देशातुन 74 वा रँक तर मुलाखतीत देशातुन तिसरा क्रमांक मिळवुन ते आयएएस अधिकारी झाले.याआधी बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कार्य केले आहे तर सध्या औरंगाबाद येथे महापालिका आयुक्त म्हणून ते काम पाहत आहेत.आपल्या या सर्वोच्च यशाचे श्रेय ते आईवडिलांबरोबरच आपल्या या गुरुजणांना देतात.
शिक्षकांकडून विनम्रता, धाडसीपणा शिकलो
शिक्षकांकडून आपण काय शिकलो हे सांगतांना ते म्हणाले, उदयराज मिश्रा या आपल्या शिक्षकाकडून माणसाने कुठल्याही परिस्थितीत विनम्र कसे राहावे ,आपल्या कामाप्रती, समाजाप्रती समर्पन भाव राखावा या गोष्टी मी शिकलो.कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेण्याची क्षमता,धाडसीपणा हे गुण मी माझे 12 वीचे शिक्षक बालकृष्ण तिवारी यांच्याकडून शिकलो.तर प्रा.एन.आर.फारुखी नेहमी सांगत, जर आपल्याला आयुष्यात काहीतरी मोठे करायचे असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. तसेच प्रा. सुशिल श्रीवास्तव, प्रा. व्ही. सी. पांडेय यांचे देखील आपल्या आयुष्यात मोठे स्थान असल्याचे त्यांनी सांगितले.
8 मनपा आयुक्त पाण्डेय यांचे शिक्षक प्रा.सुशिल श्रीवास्तव, प्रा.व्ही.सी.पांडेय, प्रा.एन.आर.फारुखी आणि इन्सेटमध्ये बालकृष्ण तिवारी.